Latur News : लातूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपू लागली आहेत. अशा स्थितीत आता शेतकऱ्यांवर पिके वाचवण्यासाठी विकतचे पाणी
घेण्याची वेळ आली आहे. चाकूर तालुक्यातील दापक्याळ गावातील एका शेतकऱ्याचा संघर्ष समोर आला आहे. आता तर पाऊस नाही झाला तर हा संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला येणार आहे.
एकीकडे वाढता खर्च आणि दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा, शेतकरी दुहेरी संकटात
पावसाळ्याचा दीड महिना उलटला. पण दमदार पावसाचा पत्ता नाही. त्यामुळं शेतातील पिके तहानेने व्याकूळ झाली आहेत. चाकूर तालुक्यातील दापक्याळ गावातील शेतकरी मैनुद्दीन शेख यांनी एका एकरात टोमॅटोची लागवड केली. मात्र पाऊस नाही आणि बोअरचं पाणीही आटलं. अखेर टोमॅटोचं पीक वाचवण्यासाठी त्यांनी टँकरने पाणी विकत घेण्याचा निर्णय घेतला. टँकरमधील पाणी घागर, बादली आणि मगाच्या सहाय्याने प्रत्येक झाडापर्यंत पोहोचवलं जात आहे. या कष्टात संपूर्ण कुटुंबही खांद्याला खांदा लावून उभं आहे. एकीकडे वाढता खर्च आणि दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा अशा दुहेरी संकटातही पीक वाचलं पाहिजे हीच या शेतकऱ्याची धडपड सुरु आहे.
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या कृपेची प्रतीक्षा
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या कृपेची प्रतीक्षा आहे. कारण वेळेत पाऊस झाला नाही, तर फक्त टोमॅटोच नाही तर अनेक पिकांवर संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भंडारा जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे तर काही भागात पाऊस पडत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसानंतर भंडाऱ्याच्या तुमसरात जलमय स्थिती झाली आहे. तुमसरात पेट्रोल पंपही जलमय झाला. मध्यप्रदेशला जोडणाऱ्या मार्गावर पाणी साचले आहे. भंडारा शहरासह ग्रामीण भागात आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. सुमारे दोन तासपर्यंत पावसाची धूमशान सुरू होती. मुसळधार पावसामुळं तुमसरात जलमयस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणारा तुमसर शहरातून जाणारा महामार्ग जलमय झाला. या महामार्गावरून जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करून प्रवास करावा, लागला. या सोबतचं तुमसर शहरातील अंतर्गत रस्ते आणि एक पेट्रोल पंप पाण्याखाली आला. तुमसर नगर परिषदेच्या नियोजनाअभाही मुसळधार पावसानं तुंबलेल्या रस्त्यावरून मार्ग काढतांना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्यानं नागरिकांमध्ये संताप बघायला मिळाला. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं पावसाचं पाणी कमी व्हायला सुरुवात झाली आहे














