Ukraine Russia War : युक्रेन आणि रशियाने एकमेकांवरील हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनमधील ओडेसा बंदरातून निघालेल्या एमव्ही गोल्डन लिओ जहाजावर हल्ला झाला
आहे. यामध्ये चार भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि एकाची प्रकृती गंभीर आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. हल्ल्याच्या वेळी जहाजावर पाच भारतीयांसह एकूण 17 कर्मचारी होते अशी माहितीही देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याचा आणि निष्पाप नागरिकांचे प्राण धोक्यात घालण्याचा निषेध केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, 19 जुलै 2026 रोजी सायंकाळी, ओडेसा बंदरातून निघताना एमव्ही गोल्डन लिओ जहाजावर हल्ला झाला. जहाजावर पाच भारतीय नागरिकही होते. दुर्दैवाने, चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. केवळ एकाची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही युक्रेनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही मृत भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र शोक व्यक्त करतो आणि जखमी भारतीय नागरिक लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त करतो."
दरम्यान, या हल्ल्यानंतर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत अशा हल्ल्यांचा निषेध करतो. व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे, निष्पाप नागरिकांचे जीवन धोक्यात घालणे, किंवा नौकानयन आणि व्यापाराच्या स्वातंत्र्यात अडथळा आणणे हे निंदनीय आहे आणि असे केले जाऊ नये असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
युक्रेनच्या नौदलाने काय म्हटले?
युक्रेनच्या नौदलाच्या म्हणण्यानुसार, रशियाने गिनी-बिसाऊचा ध्वज असलेल्या 'गोल्डन लिओ' या जहाजावर तीन क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. हे जहाज 'मका' घेऊन जात होते आणि त्यावर भारतीय-सीरियन कर्मचारी होते. या हल्ल्यामुळे जहाजावर आग लागली. युक्रेनच्या बंदर प्राधिकरणाने कळवले की, बचावकार्य रात्रभर सुरू होते. एकूण नऊ कर्मचारी आणि एक पायलट ठार झाले.
गेल्या काही आठवड्यांत युक्रेन आणि रशियाने एकमेकांवरील हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनच्या ओडेसा प्रदेशाच्या राज्यपालांनी सांगितले की, या महिन्यात आतापर्यंत रशियन हल्ल्यांमध्ये 28 लोक ठार झाले आहेत. सोमवारी, रशियाच्या बेलगोरोड प्रदेशात एका बसवर झालेल्या युक्रेनियन ड्रोन हल्ल्यात एका मुलासह पाच जण ठार झाले, तर युक्रेनच्या अनेक शहरांवर झालेल्या रशियन हल्ल्यांमध्ये किमान आठ जण जखमी झाले.














