What is the story about?
Ratnagiri Rain News : राज्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात अद्यापही चांगला पाऊस पडलेला नाही. मुंबईसह
ठाणे पालघऱ, पुणे कोकण या भागात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळं खेडमध्ये जगबुडी नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे.
खेड दापोली गुहागरमध्ये पावसाचा जोर वाढला, प्रशासनाकडून स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर खेड दापोली गुहागरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरु असल्यामुळं वाहतुकीवर देखील काही ठिकाणी परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, जगबुडी नदीला पूर आल्याने प्रशासनाकडून स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर वाढल्यास जगबुडी नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दापोली तालुक्यात दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामांना वेग
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आ हे. शेतकरी सकाळपासून शेतात उतरून भात लागवडीची कामे करत आहेत. हिरवाईने नटलेली शेतं, चिखलात पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली भात लावणी आणि शेतकऱ्यांची लगबग असे नयनरम्य चित्र सध्या दापोली तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. वेळेत झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या असून, बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलल्याचे चित्र आहे.
धुळे जिल्ह्यात दमदार पावसाची शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रतीक्षा कायम
जुलै महिन्याची 19 तारीख उलटून देखील धुळे जिल्ह्यात दमदार पावसाची शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही जुलै महिन्यात केवळ दोन दिवस पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया जाण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. दुबार पेरणीची वेळ पुढील काही दिवसात येऊन ठेपण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. पुढील काही दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.














