US Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव (Middle East Conflict) दिवसागणिक अधिक वाढतच असल्याचे चित्र आहे. अमेरिकी सैन्याने पुन्हा एकदा इराणवर
हवाई (US Iran Conflict) हल्ले केले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांना धोका निर्माण करणाऱ्या इराणच्या क्षमता कमकुवत करणे आणि जॉर्डनमधील अमेरिकी सैनिकांवर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. तर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) या संदर्भात माहिती दिली आहे. शनिवारी ईस्टर्न टाईमनुसार सायंकाळी 6 वाजता, राष्ट्राध्यक्षांच्या (Donald Trump) निर्देशानुसार हा हल्ला करण्यात आला आहे.
US Iran Conflict: अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सैन्याला पूर्ण मोकळीक
मध्यपूर्वेतील युद्ध शमण्याऐवजी अधिकच चिघळत असल्याचे दिसते. सलग अकराव्या दिवशी अमेरिका आणि इराणने एकमेकांच्या तळांवर हल्ले केले आहेत. पण या संदर्भातील सर्वात मोठी बातमी आता थेट व्हाईट हाऊसमधून येत आहे, जिथे जॉर्डनमध्ये दोन अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. इस्रायली वृत्तवाहिनी 'चॅनल 14' ने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एक खळबळजनक दावा केला आहे की, ट्रम्प यांनी अमेरिकी सैन्याला इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडण्याचा आदेश दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने पेंटागॉन आणि त्यांच्या संपूर्ण सैन्याला जॉर्डनमधील दोन अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. यापूर्वी, ट्रम्प यांनी या मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केले होते आणि इराणला स्पष्ट इशारा दिला होता की वॉशिंग्टन तेहरानला अण्वस्त्रे मिळवण्याची कधीही परवानगी देणार नाही.
दरम्यान, ट्रम्प यांनी 'न्यूजनेशन' या अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणी हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या दोन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू 'अत्यंत दुःखद' आहे आणि वॉशिंग्टन इराणला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही. इराण आता सामंजस्य कराराचे पालन करत नाही, या गोष्टीची आपल्याला पर्वा नाही, असेही ते म्हणाले.
इराणने जॉर्डनमधील एका अमेरिकी तळावर पुन्हा एकदा हल्ला केला. इराणने जॉर्डनमधील मुवफ्फाक साल्टी हवाई तळावर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. तळावरून रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये क्षेपणास्त्रे थेट अमेरिकी लष्करी तळावर पडताना दिसत आहेत. इराणने अमेरिकेची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. इराणने सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या मुवफ्फाक साल्टी हवाई तळावर वारंवार हल्ले केले आहेत.
Today at 6 p.m. ET, U.S. forces began launching new airstrikes against Iran at the Commander in Chief’s direction. The strikes are designed to further degrade Iran’s ability to threaten commercial shipping in the Strait of Hormuz and swiftly punish Islamic Revolutionary Guard…
— U.S. Central Command (@CENTCOM) July 18, 2026
Middle East Conflict : जॉर्डनमध्ये दोन अमेरिकी सैनिक ठार, एक बेपत्ता
दरम्यान, 17 जुलै रोजी जॉर्डनमध्ये इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात दोन अमेरिकी सैनिक ठार झाले. आणखी एक सैनिक अद्याप बेपत्ता आहे. सैनिकांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. लष्कराने म्हटले आहे की, त्यांच्या कुटुंबीयांना अधिकृत माहिती दिल्यानंतर 24 तासांनी त्यांची नावे जाहीर केली जातील.
US Iran Conflict: ठार झालेल्या अमेरिकी सैनिकांची एकूण संख्या 16, तर 430 हून अधिक सैनिक जखमी
अमेरिकी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर चार सैनिकांना उपचारासाठी जॉर्डनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्या चौघांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. किरकोळ जखमी झालेले इतर सैनिक उपचारानंतर कर्तव्यावर परतले आहेत. या घटनांमुळे युद्धाच्या सुरुवातीपासून ठार झालेल्या अमेरिकी सैनिकांची एकूण संख्या 16 झाली आहे, तर 430 हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत.













