रत्नागिरी : सध्या भाजप आणि शिवसेना (Shivsena) पक्षाकडून विरोधी पक्षातील आमदार, खासदार गळाला लावले जात आहेत. नुकतेच ठाकरेंच्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची
साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, ठाकरेंचे आमदारही त्यांची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर, विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक असलेल्या भास्कर जाधवांचेही नाव या यादीत जोडले जाते. मात्र, आता भाजपा आमदारानेच थेट भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांना ऑफ दिली आहे. भास्कर जाधव यांची सत्तेत गरज असल्याचं आमदार प्रमोद जठार (Pramod jadhar) यांनी म्हटलं. जठार यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चिपळूणमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या जंयतीनिमित्त आमदार प्रमोद जठार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव एकत्र आले होते. येथील कार्यक्रमानंतर आमदार जठार यांनी माध्यमांशी बोलताना भास्कर जाधवांना थेट ऑफरच दिली. भास्कर जाधव कोकणाला तुमची गरज आहे, तुम्ही आम्हाला पाहिजे असे म्हणत एकप्रकारे भाजप आमदार प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांना खुली ऑफरच दिली आहे. भास्कर जाधव जेष्ठ आमदार असून राज्याच्या राजकारणात त्यांचे वेगळे स्थान आहे. उबाठामध्ये त्यांना जे काम द्यायला पाहिजे ते दिले जात नाही, त्यांचा उपयोग उबाठाकडून केला जात नाही. त्यांना विरोधी पक्षनेताही करत नाहीत. त्यामुळे, भास्कर जाधव यांची सत्तेत गरज असल्याचंही जठार यांनी म्हटलं. उबाठामध्ये त्यांना जे काम द्यायला पाहिजे ते दिले जात नाही. चिपळूणमध्ये आम्ही दोघांनी आज एकच झाड लावलं, ते झाड भविष्यात चांगली फळे देईल, असेही भाजप आमदार प्रमोद जठार यांनी म्हटले, आमदार जठार यांच्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे.
गळाभेट, मिले सूर मेरा तुम्हारा
विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार आणि आमदार भास्कर जाधव यांच्यातील शाब्दिक संघर्षानंतर आज चिपळूणमध्ये दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसून आले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात दोघांची उपस्थिती होती. यावेळी प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांना मिठी मारत मिले सुर मेरा तुम्हारा.. अशी मिश्कील टिप्पणी केली. काही दिवसांपूर्वी गुहागरमधील स्वच्छता अभियानावेळी प्रमोद जठार यांनी गुहागरमधील कचरा आम्ही साफ करू, अशी टीका करत भास्कर जाधव यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यानंतर लोटे एमआयडीसी दौऱ्यात भास्कर जाधव मतदार संघाचे आमदार असले तरी एमआयडीसीचा पालक आमदार मी आहे, असेही जठार यांनी म्हटले होते. या सर्व घडामोडींनंतर आजची दोन्ही नेत्यांची गळाभेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
हेही वाचा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी बोलणार














