Uddhav Thackeray: पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाच्या वतीने मुंबईतील दादर (Dadar) परिसरात काल आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी आता पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) या आंदोलनाविरोधात तब्बल तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Uddhav Thackeray: 'या' 3 कारणांमुळे दाखल झाले गुन्हे
पहिला गुन्हा: विनापरवानगी आंदोलनाचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवर पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरा गुन्हा: आंदोलनाला पोलिसांची अधिकृत परवानगी नसतानाही लोकांना आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने घटनास्थळी जमण्याचे आवाहन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
तिसरा गुन्हा: मुख्य आंदोलनानंतरही दादर परिसरात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. यामुळे दादरसारख्या गजबजलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. रस्ता अडवून नागरिकांना वेठीस धरल्याप्रकरणी हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Uddhav Thackeray: "हे दळभद्री सरकार आता बदललंच पाहिजे"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
दरम्यान, कालच्या आंदोलनात कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, "हे सरकार आपल्याला रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही. त्यामुळे हे दळभद्री सरकार आता बदललंच पाहिजे. तुम्ही सर्वांनी आता केवळ कार्यकर्ते न राहता नेते व्हा आणि हे सरकार बदला. आज तुमच्यात जी आग दिसत आहे, ती आग हे सरकार बदलेपर्यंत पेटती राहिली पाहिजे आणि या हुकूमशाही सरकारला तिने भस्म केलं पाहिजे. या लोकांनी तुमचं भवितव्य चोरलं आहे," असे त्यांनी म्हटले
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "सोनम वांगचुक यांनी या देशाला काय दिलं आणि या दळभद्री सरकारने देशाला काय दिलंय, याचा हिशोब एकदा होऊनच जाऊ दे. उणे तापमानात बर्फामध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी 'सोलर कॅम्प' बनवून दिले. लडाखमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना त्या ठिकाणी कृत्रिम 'आइस माउंटेन' ज्यांनी बनवले, आज त्याच सोनम वांगचुक यांना हे सरकार देशद्रोही आणि चीनचे हस्तक ठरवत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे," असे देखील त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल














