Congress on Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: राजधानी दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन होत असतानाच आता देशभरामध्ये आंदोलनाचं लोण
पसरलं आहे. दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या नीट परिक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनासह केंद्र सरकारच्या भुमिकेवरती आता मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू 26 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. मुंबईत काल (23 जुलै) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा करत विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि इतर राजकीय पक्षांनी या मुद्द्यांवर एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, 26 जुलैला (रविवारी) होणाऱ्या मोर्चामध्ये आता काँग्रेस पक्ष देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, रविवारी होणाऱ्या मोर्चाची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. जर विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती सर्व पक्ष एकत्र येत असतील तर आम्हाला कुठलीही हरकत नसल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी दिली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मोर्चामध्ये एकाच मंचावरती राज ठाकरे, उद्धव ठाकरे, यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेतेही एकत्र दिसणार असल्याचे बोललं जात आहे.
सुरक्षा कवच म्हणून युवासेना मैदानात, आदित्य ठाकरे यांचे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश
दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या अनुषंगाने सुरक्षा कवच म्हणून युवासेना मैदानात उतरेल. मोर्चला येणाऱ्या मुलांवर पोलीस कारवाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं आदित्य ठाकरे यांनी सुचवलं आहे. 26 जुलैला मुंबईत होणाऱ्या ठाकरेंच्या महामोर्चा आधी युवासेनेची ऑनलाईन बैठक पार पडली. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी मोर्चाला येणाऱ्या मुलांची काळजी घ्या. त्यांच्यावर पोलीस कारवाई होणार नाही याची दक्षता घ्या. अश्या सूचना आदित्य ठाकरे यांनी काल बैठकीत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहे.
ठाकरे बंधूंच्या मोर्चावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray)
मी आठवण करुन देतो, राज्यातला सर्वात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मु्ख्यमंत्री असताना झाला. यामध्ये आयएएस अधिकाऱ्यांपासून सगळे सामील होते. इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही. तसेच केवळ टीईटी घोटाळाच झाला नाही, तर जे नापास होते, त्यांना पास करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही टीईटी परिक्षेत घोटाळा होत असल्याचं लक्षात येताच, परिक्षेआधी घोटाळेबाजांना पकडलं. स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून हे बंद करा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
- Raj Thackeray Uddhav Thackeray PC On CJP Protest: आता तुम्ही बघा, तिरंगा घेऊन सहभागी व्हा...; ठाकरे बंधूंच्या मुंबईत मोर्चा, पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे!














