Rahul Gandhi Attack On PM Modi : दिल्लीतील जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या तीव्र आंदोलनादरम्यान लोकसभेचे विरोधी
पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अत्यंत कडक शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात 'युवक विरोधी' पंतप्रधान आहेत. ते इतके युवक विरोधी आहेत की, संपूर्ण देशात अपयशी ठरलेले शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामासुद्धा घेऊ शकत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
शैक्षणिक गोंधळ आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या रास्त प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरकार त्यांच्यावर लाठीमार करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
Rahul Gandhi Tweet On Paper Leak : 'गुन्हेगार मोकाट आणि रास्त मागण्या करणारे विद्यार्थी रस्त्यावर'
सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, "देशात आतापर्यंत 152 पेपर लीक झाले, 7.5 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले, मात्र एकाही दोषीला शिक्षा झाली नाही. मग शिक्षा कोणाला मिळाली? तर रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या निष्पाप तरुणांना! जेव्हा या विद्यार्थ्यांनी शिक्षणातील गोंधळाबाबत रास्त प्रश्न विचारले, तेव्हा त्यांना उत्तरादाखल पोलिसांच्या लाठ्या मिळाल्या. पेपर लीक करणारे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि देशाचे भवितव्य असणारे विद्यार्थी रस्त्यावर ओढले जात आहेत, मार खात आहेत. हे सरकार केवळ तरुणांना अपयशी ठरवत नसून त्यांच्यावर तुटून पडले आहे."
Priyanka Gandhi On Re NEET Scam : 'पंतप्रधानांनी स्वतः संसदेत उत्तर द्यावे'
दुसरीकडे, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनीही या मुद्द्यावरून भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. प्रियंका गांधी म्हणाल्या, "भाजप सरकारने आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याऐवजी स्वतःच्या अपयशी धोरणांचा आढावा घेतला पाहिजे. आधी NEET चा पेपर लीक झाला, परीक्षा रद्द झाली आणि आता 'री-नीट' (Re-NEET) मध्येही मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याच्या बातम्या येत आहेत. खुद्द पंतप्रधान या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले होते, मग असे असतानाही हे प्रकार कसे घडत आहेत? संसदेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि पंतप्रधानांनी देशातील कोट्यवधी तरुणांचे ऐकून त्यांना स्वतः उत्तर दिले पाहिजे."
JP Nadda Met CJP Delegation : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा निष्फळ?
दुसरीकडे, सीजेपी (CJP) च्या एका प्रतिनिधीमंडळाने केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. या बैठकीनंतर आंदोलकांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, सरकारच्या बाजूने कोणत्याही ठोस उपाययोजनांचे आश्वासन मिळालेले नाही, त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन असेच सुरू राहील. तर दुसरीकडे जे. पी. नड्डा यांनी या बैठकीचे फोटो शेअर करत, आंदोलकांच्या मागणीवरूनच ही सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सोशल मीडियावर स्पष्ट केले.
ही बातमी वाचा:
- CJP Protest : मुलाला आईसह पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुलाने टाहो फोडला; मुंबईत आंदोलकांवर लाठीचार्ज













