Mohan Bhagwat On Jantar Mantar Protest: आजची तरुण पिढी दिशाहीन किंवा भरकटलेली नाही आणि त्यांना समजून घेण्यासाठी अर्थपूर्ण चर्चेची गरज आहे. आताचा काळ आधीसारखा
राहिलेला नाही. नवीन पिढी प्रश्न विचारते, आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगण्याची गरज आहे. त्यांना वेळ देणे आणि त्यांच्याशी संवाद करण्याची गरज असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नीट पेपरफुटीविरोधात (NEET Protest) देशभरात सुरु असलेल्या परिस्थितीवर मोठं भाष्य केलं आहे.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्लीत गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठ्या विद्यार्थी-नेतृत्वाखालील आंदोलनांपैकी एक सुरू असतानाच आरएसएस प्रमुखांनी ही टिप्पणी केली आहे. 'विश्व मंगल्य सभा' कार्यक्रमात बोलताना, भागवत यांनी पिढ्यांमधील वाढत्या दरीवर भाष्य केले आणि आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. दिल्लीतील आंबेडकर भवनात विश्वमांगल्य सभेत ‘युगानुकूलत्व मातृत्व’ कार्यक्रमात ते बोलत होते.
Mohan Bhagwat : तरुणांचा विश्वास जिंकण्यासाठी संवादाची गरज आहे
सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले की, तरुणांचा विश्वास जिंकण्यासाठी संवादाची गरज आहे, आदेशांची नाही. आपल्याला नवीन पिढीला आपलेपणाची भावना द्यायला हवी. आपल्याला संवाद साधायला हवा. हुकूमशाही नाही, तर चर्चा. आदेश नाही, तर एकमत, असे भागवत म्हणाले. भागवत यांनी जंतर मंतर येथील सुरू असलेल्या आंदोलनाचा थेट उल्लेख केला नसला तरी, त्यांच्या वक्तव्याच्या वेळेवरून कोणताही संशय उरला नाही.
इतर राज्यांमध्येही पसरलेल्या 'सीजेपी' (CJP) आंदोलनांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रमुखांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. २० जुलै रोजी संसदेपासून अवघ्या काही अंतरावर आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षामुळे लोकांचा रोष अधिकच वाढला आहे. शुक्रवारी ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी संघाच्या प्रमुखांच्या या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "मोहन भागवत जी... जंतर-मंतरवरील घटना... गेल्या एका महिन्यातील तुमचे मौन हे तुमच्या उपदेशांपेक्षाही अधिक बोलके आहे," असे ट्विट त्यांनी केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
- Mumbai Police Viral Video: '50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू; "त्या पोलीस काकांना निलंबित करू नका", व्हायरल व्हिडीओतील तरुणाने सांगितली गाडीतील इनसाईड स्टोरी















