मुंबई : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे (Agitation) पडसाद गल्लीतही पाहायला मिळत आहेत. देशातील विविध राज्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा
विरोध पाहायला मिळत आहे, लोक रस्त्यावर उतरुन आपला विरोध व्यक्त करत आहेत. सोशल मीडियातूनही तरुणाई एकत्र येत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे तीव्र पडसाद मुंबईतही उमटल्याचं दिसून आलं. मुंबईतील (Mumbai) आंदोलनावेळी दोन व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले. त्यामध्ये, एक मुलगी पोलिसांची व्हॅन अडवताना दिसते. तर, दुसऱ्या व्हिडिओत पोलीस एका तरुणाला धमकी देत आहे. त्यातील मुंबई गर्ल ठरलेल्या रियाने संवाद साधला आहे.
दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवारी मुंबईतील विविध भागांत विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. बुधवारी चेंबूर आणि दादर परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र आले होते. चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करणारे पोस्टर्स हातात घेऊन आंदोलन केले. या आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध करून ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला. दुसरीकडे, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथेही मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली.
दादरच्या शिवाजी पार्कजवळ पोलीस स्थानबद्ध केलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये बसवून नेण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी हुडी आणि कॅप घातलेली तरुणी पुढे आली, तिने न घाबरता पोलिसांची व्हॅन आपल्या एका हाताने अडवली. रिया अहीर ही तरुणी मुसळधार पावसात थेट पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहिली. रियाच्या धाडसाची आणि आंदोलनातील कणखर भूमिकेची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली असून, एका तरुणीने एकटीने पोलीस गाडी रोखून धरल्याचा हा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. नेटीझन्स तिचं कौतुक करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता तिने एबीपी माझाशी संवाद साधला.
पोलिसांनी विद्यार्थ्यांना इल-लीगलपणे ताब्यात घेतल्यामुळे मी आक्रमक होऊन पोलिसांची गाडी थांबवली असल्याचा रियाने सांगितलं. तसेच, आम्ही सोशल मीडियातून आंदोलनाची भूमिका घेतील, त्यातूनच एकत्र जमलो होतो. मात्र, पोलिसांनी बेकायदेशीरपणे तरुणांना ताब्यात घेतल्याने एक जागरुक नागरिक म्हणून मी पोलिसांना विरोध केल्याचंही रियाने स्पष्ट केलं.
कोण आहे रिया अहिर
रिया अहीर अंधेरी पूर्वेत MIDC परिसरातील रहिवाशी आहे. रिया शिक्षण घेत असून कलाकार व व्यवसायिक देखील आहे, त्यासोबत मागील 7 वर्षापासून थेटर कलाकार म्हणून सुद्धा रिया काम करते. रिया अभिनेत्री, मॉडेल आणि एंटरप्रेन्योर (उद्योजक) आहे. ती अनेक प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओंमध्ये झळकली असून, अलीकडेच आलेले तिचे 'दिलबरा' हे गाणे खूप चर्चेत राहिले होते. मनोरंजन विश्वाव्यतिरिक्त रिया 'रियासत' (Riyasat) नावाचा स्वतःचा पर्सनलाइज्ड क्लोथिंग ब्रँड चालवते; जिथे ती स्वतः कपडे डिझाइन आणि हँडक्राफ्ट करते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर तिचे १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
हेही वाचा
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ














