PM Modi On NEET Paper Leak: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली नीट पेपर लीक प्रकरणावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस
अधिक तीव्र होत चालले आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. "देशातील तरुण पिढीचे हित आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर लीकच्या सर्व प्रकरणांतील दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' स्थापन केले जातील. संबंधित विभागाने यावर तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत," असे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांतील हे एक अत्यंत पाऊल असल्याचे सांगत "युवांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही," असा इशाराही पंतप्रधान मोदींनी दिला आहे.
एक्स पोस्टमध्ये काय म्हणाले मोदी?
"देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीला गती देण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन केली जातील, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल. आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जो कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल, त्याला सोडले जाणार नाही."
कसे काम करणार फास्ट ट्रॅक कोर्ट?
फास्ट ट्रॅक कोर्ट या विशेष न्यायालये असतात, ज्यांचा मुख्य उद्देश संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी सामान्य न्यायालयांपेक्षा अत्यंत वेगाने पूर्ण करणे हा असतो. या न्यायालयांमध्ये प्रकरणांना प्राधान्य देऊन दररोज किंवा सातत्याने सुनावणी घेतली जाते. पुरावे, साक्षीदार आणि इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कमीत कमी वेळेत निकाल देण्याचा प्रयत्न केला जातो.
जर पेपर लीक प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन झाले, तर NEET सह इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणांची सुनावणी वेगाने होईल. यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींना तातडीने शिक्षा होण्यास मदत मिळेल, विद्यार्थ्यांना न्यायासाठी वर्षे न वर्षे वाट पाहावी लागणार नाही आणि भविष्यात असा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना कडक इशारा मिळेल.
तरुणांच्या भवितव्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही- मोदी
यापूर्वी पार पडलेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीतही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले होते की, देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अत्यंत गंभीर चिंतेचा विषय असल्याचे म्हटले.
हे ही वाचा...
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील; CJP कडून शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन
तसेच, काही राजकीय पक्ष आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी निष्पाप विद्यार्थ्यांचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. दुसऱ्या बाजूला, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्यावर उत्तम उपचारांचे निर्देश दिले.
मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्षाने जंतर-मंतरवर ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा दिला असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, 20 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या "चलो संसद" मार्चदरम्यान हजारो विद्यार्थी आणि तरुण संसद भवनाच्या दिशेने कूच करू लागले. त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी कडक बॅरिकेडिंग केले होते. या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक उडाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये अनेक आंदोलक विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
हे ही वाचा...
Maharashtra Bandh: विद्यार्थ्यांवरील लाठीमाराविरोधात 'महाराष्ट्र बंद'ची हाक! वाचा काय सुरू आणि काय बंद?













