केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी काल उशिरा गुरुग्राम येथील मेंदाता रुग्णालयात जाऊन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी
या दोन्ही मंत्र्यांनी वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून डिस्चार्ज केल्यानंतर पुढील उपचारासाठी गुरुग्रामच्या मेंदाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पीटीआयच्या वृत्तानुसार, जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वांगचुक यांना काल संध्याकाळी साडे सात वाजता मोठ्या बंदोबस्तात मेंदाता रुग्णालयात आणण्यात आले होते. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वांगचुक यांना आंतरिक चिकित्सा विशेषज्ञ डॉ. सुशीला कटारिया यांच्या निगराणीखाली आयसीयू-आठमध्ये भर्ती करण्यात आलं आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर भरती
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली होती. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने हे आदेश दिले होते. सुनवाणी वेळी कोर्टाने मेदांता रुग्णालायत वांगचुक यांना दाखल करण्यावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता. पण डॉक्टरांनी वांगचुक हे डॉक्टरांच्या देखरेखी खाली सातत्याने राहिले पाहिजे, असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयातून संध्याकाळी सुट्टी देण्यात आली आणि मेंदातामध्ये आणण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व मेडिकल रिपोर्टही जोडण्यात आले होते.
मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मंगळवारी देशभरात आंदोलनं करण्यात आले. दिल्लीसह महाराष्ट्र, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, हरियाणा, झारखंड यांसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेस नेते आणि युवकांनी आंदोलनं केली. मंगळवारी राहुल गांधी हे वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा, दोन मुख्यमंत्री आणि पक्षाच्या इतर नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. सोमवारी झालेल्या सीजेपीच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही सहभाग घेतला होता.













