Maharashtra launches Bharat Taxi Service with Low Fares: सहकाराची नवी क्रांती असलेल्या 'भारत टॅक्सी' मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा एक नवा अध्याय
सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात आयोजित विशेष सोहळ्यात 'भारत टॅक्सी' (BHARAT TAXI) सेवेचा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ओला आणि उबरसारख्या खासगी ॲग्रीगेटर्सनी वाहतूक क्षेत्रात योगदान दिले असले, तरी सण-उत्सव आणि पावसाळ्यात होणारी प्रचंड भाडेवाढ (Dynamic Pricing) तसेच चालकांवर लादले जाणारे अवाजवी कमिशन यामुळे सर्वसामान्य हैराण होते. भारत टॅक्सीच्या माध्यमातून आता एक पारदर्शक, सुरक्षित आणि स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे." हे पण वाचा : Mumbai Local: मुंबईकरांनो गर्दीला करा बायबाय; दर 2 मिनिटांनी लोकल धावणार, धक्काबुक्की अन् रेटारेटी थांबणार
काय आहेत भारत टॅक्सीचे दर?
एकाच मोबाईल ॲपद्वारे कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी अशा तिन्ही सेवा मिळतील. काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 31 रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर 21 रुपये असा सुटसुटीत दर निश्चित करण्यात आला आहे. संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर सहकार विभागाचे नियंत्रण असेल.
उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि टप्पे
टप्प्याटप्प्याने विस्तार - पहिल्या टप्प्यात 600 टॅक्सींचे अनावरण करण्यात आले असून, लवकरच 1000 पेक्षा जास्त टॅक्सींचे लक्ष्य आहे.
विस्तार योजना - मुंबई आणि पुण्यातून सुरू झालेली ही सेवा आगामी काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाईल.
स्थानिकांना रोजगार - नवी मुंबई विमानतळ परिसरातील प्रकल्पबाधित आणि स्थानिक तरुणांना यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
हे पण वाचा : टाटा-महिंद्राची धाकधूक वाढली! Kia ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV लॉन्च; 39 मिनिटांत चार्ज होणार अन् 526km धावणार, पाहा फीचर्स अन् किंमत
चालक आता कर्मचारी नाही, तर थेट मालक
केंद्रीय राज्यमंत्री (सहकार आणि नागरी विमान वाहतूक) मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले की, 'सहकार टॅक्सी' संस्थेमुळे चालक आता कर्मचारी न राहता थेट सभासद, मालक बनले आहेत. संस्थेच्या नफ्याचा लाभांश (डिव्हिडंड) थेट चालकांच्या खात्यात जमा होईल. देशभरात सुमारे 8 लाख चालक या संस्थेशी जोडले गेले असून, 77 कोटी रुपये कोणत्याही कमिशनशिवाय थेट चालकांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. दिल्ली आणि गाझियाबादपाठोपाठ मुंबईत ही सेवा सुरू झाली असून, लवकरच पुणे आणि नागपूर येथे विस्तार होईल.सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 'भारत टॅक्सी' मुळे सर्वसामान्यांना आर्थिक सक्षमतेचा नवा मार्ग मिळेल असा विश्वास व्यक्त केला, तर प्रवीण दराडे यांनी प्रास्ताविकात तंत्रज्ञान आणि सहकाराच्या या संगमाला 'सहकारातून समृद्धी' च्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल म्हटले.













