Mumbai Section 144: देशभरात सध्या तापलेल्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी मुंबईतून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत
आहे. शहरातील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस प्रशासनाने एक मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. मुंबई शहरामध्ये येत्या 23 जुलैपासून ते 6 ऑगस्ट या कालावधीत सलग 15 दिवसांसाठी कडक जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमून कोणतीही अनिष्ट घटना किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पूर्वखबरदारी म्हणून पोलिसांनी हे कठोर निर्बंध लादले आहेत.
सरकारकडून चर्चेचं निमंत्रण
सध्या देशात नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालले आहे. 20 जुलै 2026 रोजी निघणाऱ्या संसद मोर्चापासून सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान पक्षाचे नेते अभिजीत दीपके यांनी आपले अडीच दिवसांचे उपोषण मागे घेतले आहे. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सरकारच्या वतीने चर्चेची तयारी दर्शवल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी केला आहे.
सुरक्षा यंत्रणांचा हाय अलर्ट
संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतरवर होणाऱ्या या महाआंदोलनामुळे गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही खबरदारीचे उपाय म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अनेक बाबींवर कडक निर्बंध असणार आहेत.
मोर्चे आणि सभांवर पूर्ण बंदी
पोलीस प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येणे, मोर्चे काढणे, आंदोलने करणे किंवा सार्वजनिक सभा आयोजित करण्यास मनाई असेल. शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
आगामी काळातील विविध कार्यक्रम, उत्सव आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईतील सर्व सामान्य नागरिकांनी पोलिसांच्या या अधिकृत आदेशांचे तंतोतंत पालन करावे आणि शहरात शांतता राखण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.